१. एकदा वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृह प्रमुखांच्या पूर्व संमतीशिवाय विद्यार्थ्याला अनुपस्थित राहता येणार नाही.
२. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या/तिच्या कॉलेजमध्ये नियमितपणे हजेरी लावली पाहिजे आणि रजेशिवाय कॉलेज किंवा वसतिगृहात गैरहजर राहू नये. गैरहजर राहिल्यास कारवाई करण्यात येईल.
३. वसतिगृह प्रमुखांच्या पूर्व संमतीशिवाय शाळा कॉलेजच्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचे बाहेर जाऊ नये.
४. वसतिगृहात विनाशुल्क (फ्री) देण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वापरावे व शैक्षणिक वर्षाअखेरीस सुस्थितीत परत करावे. हरविलेल्या किंवा निकामी केलेल्या वस्तूंची योग्य ती किंमत भरून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील. साहित्य व्यवस्थित परत न केल्यास विद्यार्थ्यांस पुढील शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ही बाब शिक्षण संस्थांना कळविली जाईल.
५. विद्यार्थ्यांजवळ वसतिगृहातर्फे दिलेल्या आणि त्याच्या स्वतःच्या मौल्यवान वस्तु सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पूर्णपणे विद्यार्थ्याची राहील.
६. शैक्षणिक वर्षातील सर्व परीक्षा देणे विद्यार्थ्याना बंधनकारक राहील.
७. अभ्यासक्रमातील प्रगती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे, शैक्षणिक वर्षा अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश रद्द केला जाईल.
८. प्रामुख्याने वसतिगृहातील खोल्या नीटनेटक्या आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय खोल्या आणि खोल्यातील मांडणी विद्यार्थ्यांनी बदलू नये.
९. विद्यार्थ्याने आपली वर्तणूक वसतिगृहात सौजन्यशील ठेवावी. चळवळ, संप, अन्नसत्याग्रह, राजकीय कार्य, गटात घोषणाबाजी करणे अथवा तत्सम प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. तसेच वसतिगृह प्रतिष्ठेला बाधक होईल असे कोणतेही वर्तन करु नये.
१०. वसतिगृह व्यवस्थेत काही अडचण असल्यास वसतिगृह प्रमुखांच्या मदतीनेच ती सोडविली पाहिजे. गंभीर स्वरुपाचा अन्याय होत आहे, असे वाटले तर वसतिगृह प्रमुखाच्या पूर्व संमतीने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दाद मागता येईल.
११. स्थानिक परिस्थितीनुसार वसतिगृह प्रमुख वेळोवेळी जे नियम करतील, ते विद्यार्थ्यांना बंधनकारक राहतील.
१२. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास याची कल्पना वसतिगृह प्रमुखांना ताबडतोब विद्यार्थ्यांनी द्यावी आणि औषधोपचार योजना वसतिगृह प्रमुखांनी सांगितलेल्या किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अथवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रथम करून घ्यावी.
१३. मेसमध्ये जेवताना, खाद्यपदार्थ घेतांना आरडाओरड करू नये तसेच मेस कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.
१४. जे अन्न दिले जाते ते उष्टे टाकून वाया घालवू नये, आवश्यक तेवढेच अन्न ताटात घ्यावे.
१५. वसतिगृह प्रमुखांनी ठरवलेल्या वेळेवर जेवण घेण्यासाठी मेसमध्ये जाणे बंधनकारक राहील
१६. जेवणाबाबत काही तक्रार असेल तर याबाबत कार्यालय प्रमुखाकडे तक्रार करावी, परस्पर स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांशी वादावादी करू नये.
१७. कोणत्याही नातेवाईक किंवा मित्र किंवा इतर व्यक्तींना वसतिगृहात जाता येणार नाही तसेच रात्रीच्या वेळी राहू दिले जाणार नाही असे केल्यास प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल. विद्यार्थ्यांच्या मित्र मंडळींना, नातेवाईकांना विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील खोलीवर जाता येणार नाही.
१८. विद्यार्थ्याने वसतिगृहात नियमित अभ्यास केला पाहिजे इतर विद्यार्थ्यांना त्रास होईल असे वर्तन करू नये. वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांशी प्रेम व बंधुभावाने वागले पाहिजे तसेच कार्यालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.
१९. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे व्यसन करू नये, तसे केल्याचे आढळल्यास प्रवेश तात्काळ रद्द केला जाईल.
२०. कोणत्याही कारणाशिवाय वारंवार गैरहजर राहणाऱ्या किंवा एका महिन्यापेक्षा जास्त काळ सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील.
२१. भ्रष्ट चारित्र्य किंवा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेले विद्यार्थी आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
२२. संसर्गजन्य रोग असलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून कारवाई केली जाईल आणि आवश्यक वाटल्यास त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल.
२३. वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने कोणतेही प्राणघातक शस्त्र जवळ बाळगू नये.
२४. वसतिगृहातील खोल्यांच्या भिंती, खिडक्या आणि पायऱ्यांवर कोणतेही पोस्टर लावू नये, चित्रे काढू नये किंवा आक्षेपार्ह काहीही लिहु नये.
२५. वसतिगृहात प्रवेशासाठी सादर केलेले पुरावे भविष्यात खोटे असल्याचे आढळून आल्यास, अधिकाऱ्याने केलेली कोणतीही कारवाई विद्यार्थी/विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल, खोटी माहिती देऊन प्रवेश मिळवला असेल तर त्यावर कोणताही आक्षेप न घेता प्रवेश रद्द केला जाईल.
२६. प्रत्येक विद्यार्थी/मुलींनी वसतिगृहाचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
२७. वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये परिचय व बंधुभाव वाढावा यासाठी वेळोवेळी राष्ट्रीय एकात्मतेचे कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करून एकोप्याचे वातावरण निर्माण करावे.
२८. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सण आणि इतर सरकारी प्रायोजित कार्यक्रमांना उपस्थित राहाणे बंधनकारक राहील.
२९. वसतिगृहातील विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केलेली असली तरी, विद्यार्थ्यांच्या हलगर्जीपणामुळे अथवा विद्यार्थ्यांच्या अतिउत्साहामुळे कोणतीही अनुचित घटना किंवा दुर्घटना घडल्यास अधिक्षकास जबाबदार धरता येणार नाही.
३०. राज्य सरकारने, वसतिगृह प्रमुख यांनी वेळोवेळी तयार केलेले नियम विद्यार्थ्यांना पाळावे लागतील.
३१. वसतिगृहातील वातावरण भयमुक्त व खेळकर राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावे, कोणत्याही विद्यार्थ्यांकडून इतर विद्यार्थ्यांचे शारिरीक अथवा मानसिक शोषण (रॅगिंग) होत असल्याचे आढळल्यास रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.